14।। दशसुन्दरीचरितम् ।। (गंधवती पश्चिमा)
।। द श सु न्द री च रि त म् ।। 14 गंधवती पश्चिमा पश्चिमेनी मला भेट दिलेले हे मखमली पंख आठवत समुद्राच्या वाळूवर पायांचे ठसे उमटवत फिरतांना काही झाडांची बेटंच तयार झालेली दिसत होती . ही झाडं दिसायला सुंदर नव्हती पण जमेल तिथे त्यांनी वाळूत डेरा टाकला होता . “ ही कसली झाडं ”?- मी . “ ही तर केवड्याची बनं आहेत ”. झेंडेकर सांगत होते . ह्या झाडाच्या गर्दीत केवडा येतो तरी कुठे ? केवड्याचं बन म्हणजे एक चक्रव्यूहच होता . त्या काटेरी झाडीत पानांच्यामधोमध केवड्याचं कणीस येतं . केवड्यांचं इतकं सुंदर दिसणारं कणीस मिळवण्यासाठी लोकांना ह्या काटेरी झाडासोबत बरीच झटापट करावी लागत असणार . झेंडेकरांनी हातात ठेवलेलं केवड्याचं कणीस - - त्याचा रंग - - त्याचा सुगंध - - त्याच्या प्रत्येक पानापानात लपलेल्या मऊसर मांसल भागातून - - बाहेर पडलेल्या असंख्य परागकणांनी माखून गेलेलं ते कणीस पाहता पाहता कधी मी औरंगजेबाच्या दरबारात पोचले कळलच नाही . कवी भूषण औरंगजेबाचे गुणवर्णन करीत होता . - “ हे औरंगजेबा तुझा दरबार एखाद्या सुंदर बगीचासारखा आहे . दरबारातील हे सर्व मांडलिक राजे म्हणजे सुंदर फुलां...