रुक्मणी स्वयंवराची लढाई

 

रुक्मणी स्वयंवराची लढाई

असं म्हणतात, मुलगी नवरामुलगा smart, handsome आहे की नाही हे बघते. मुलाचं रूप, व्यक्तिमत्व impressive आहे की नाही बघते. मुलीची आई मुलाकडे घरदार, जमिनजुमला, पैसा आहे की नाही बघते. मुलीचे वडील मुलाचं शिक्षण योग्य आहे नं बघतात. मुलीचे नातेवाईक मुलाचं कुळं आपल्या कुळाला साजेसं आहे का नाही बघतात. लग्नाला आलेले बाकी उपस्थित निमंत्रित मात्र जेवण सुग्रास आहे का नाही एवढाच मर्यादित विचार करतात.

 कन्या वरयते रूपं । माता वित्तं पिता श्रुतम् ।

बान्धवाः कुलमिच्छन्ति । भोजनम् इतरेजनाः ।।

 ‘हुरळली मेंढी लांडग्या मागे’ म्हणी प्रमाणे वयात आलेल्या अनेक लग्नाळु मुली वरवर स्तुती करणार्‍या, गोड बोलणार्‍या, पण प्रत्यक्षात त्यांना फसवून गळाला लावणार्‍या मुलांना भुलतात. स्टंटबाजी करत वाट्टेल तशी मोटरसायकल चालवून इंप्रेस करणार्‍या, भपकेबाज कपडे घालून उगीच strutting करत अशी तशी  केशरचना सांभाळत सिनेमा हिरोप्रमाणे वागणार्‍या, वाट्टेल तशा गाड्या आणि पैसे उडवणार्‍या छपरी हिरोंच्या प्रेमात पडतात आणि अलगद कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीप्रमाणे त्यांच्याकडून फस्त होतात वा आयुष्यभर पस्तावतात. त्यांना पुराव्यांसहित हा मुलगा लफंगा आहे हे पटवून दिलं तरी ‘‘मेरा अब्दुल वैसा नहीं’’ ह्या विचारांच्या कोशातून त्या बाहेर यायलाच तयार नसतात. थोड्याकाळची मौजमजा काही वेळातच संपते आणि जीवन उद्धस्त झाल्याचं लक्षात येतं. तर शिकलेल्या मुली मुलाचं स्वतंत्र घर, माझ्यापेक्षा उत्तम पगार अशा वरवरच्या पैसा केंद्रित विचारात अडकून बाकी महत्त्वाच्या गोष्टींना गौण मानतात. काही गोष्टींमधे सहज सुधारणा होऊ शकते तर काही गोष्टी सुधारायला वाव नसतो वा त्या सुधारण्याच्या पलिकडच्या असतात. काही काळात नवरा पैसा मिळवू शकतो, घरही घेऊ शकतो पण त्याला वाईट व्यसनं असतील तर तो सुधारणेच्या पलिकडे असतो. आज असेल तेही घालवून बसतो. मुलींना पैशासाठी थोडाही दम धरवत नसेल तर पुढे जाउन लग्न फार सुखकारक रहात नाही.

तर अनेक वेळा खेडेगावात मुली खाली मान घालून आपल्या पालकांनी लग्न ठरवलेल्या मुलासोबत त्याची चौकशीही न करता गरीब गाय कसायासोबत जावी त्याप्रमाणे जातात. रोज मरण जगतात किंवा संपूर्ण आयुष्य दावणीला बांधलेल्या गायीप्रमाणे काढतात. आत्ताच्या काळातल्या ह्या मुली सुधारीत कशा म्हणायच्या?

इतिहासात डोकावून पाहिल्यास, आपल्याकडच्या अनेक राजपूत कन्यांनी मुसलमान सुलतानांच्या ‘‘मुलगी पाठवून दे किंवा युद्धाला तयार हो’’ अशा धमक्यांना घाबरून, फशी पडून, वडिलांचे राज्य वाचविण्यासाठी, आपणहून आपल्या मर्जीविरुदध मुसलमान सुलतानांकडे जाण्याचा दुर्दैवी निर्णय घेतल्याची काही कमी उदाहरणे नाहीत. व्यापक जनहितासाठी स्वार्थत्याग हा वरवर वाटणारा उदात्त पण कचखाऊ हेतू पूर्ण अधर्माच्या, अनीतीच्या मार्गावर नेणारा असल्याने ही आत्मवंचना ना त्यांच्या हिताची ठरली, ना त्यांच्या वडिलांच्या, ना जनतेच्या! मुली बाटल्या, उद्ध्वस्त झाल्या; फसवून त्यांच्या पित्याला सर्व खानदानासह मारण्यात आलं ; आणि त्यांची राज्येही जिंकून घेतली गेली. कोणी वाचलेच तर परागंदा होऊन जीवनभर लपुन छपून, गरीबीचे चटके सोसत, अत्यंत हालात भटकत राहिले.

 

 ह्या पार्श्वभूमीवर हजारो वर्षांपूर्वीचा रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचा विवाह हा असाधारणच म्हणावा लागेल. आजही आपल्याकडे लग्नेच्छु मुलींना रुक्मिणी स्वयंवराची गोष्ट वाचायला सांगतात त्यामागे फार मोठं कारण असावं. कारण हा एका सदाचारी जोडीदाराशी लग्न करण्याचा अत्यंत विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णय आहे. Love at first site म्हणावं असा हा प्रेम विवाह नाही. पालकांनी आयोजित केलेलं स्वयंवरही नाही. वा सीता, द्रौपदी विवाहासाठी लावलेला एखादा अवघड पण जिंकून, आपल्या वीर्याचं शुल्क देऊन कृष्णाने मिळवलेली वीर्यशुल्का राजकन्या अशीही रुक्मिणी नाही. तसं पाहिलं तर शिशुपाल हा मोठा राजा होता. कृष्ण राजा नव्हता. तो द्वारकेच्या लोकशाहीद्वारा प्रस्थापित राज्यातील एक महत्त्वाचा सदस्य होता. पण शिशुपाल आणि कृष्णाच्या विचारधारेत महदंतर होतं. कृष्ण व्यापक समाजहितासाठी झटणारा होता तर शिशुपाल स्वतःच्या लाभासाठी लोभी होता.

 विवाहापर्यंत रुक्मिणी आणि कृष्ण ह्यांनी एकमेकांना पाहिलेलं नाही; असं म्हणतात की, ‘‘ गुणाः कुर्वन्ति दूतत्वं’’ म्हणजे माणसाचे गुण हेच त्याच्या दूताप्रमाणे काम करतात. ह्या उक्तीला अनुसरून, लोकांच्या बोलण्या-बोलण्यातून दूर देशी पोचलेले एकमेकांचे ऐकीव सद्गुण एकमेकांना आकर्षित करून गेले. आणि तेव्हाच दोघांच्याही मनात एकमेकांविषयी निर्माण झालेलं आकर्षण एका निश्चयात बदललं---लग्न करीन तर ह्याच्याशीच किंवा हिच्याशीच! दोघेही आपल्या विचारांशी कायम प्रामाणिक राहिले.

पण प्रत्येक मनोवांछित मार्ग सरळ नसतो. त्याला अनेक प्रकारच्या विरोधाच्या काटेरी मार्गावरून जावं लागतं. अनेक संकटांना हिमतीनी आणि हिकमतीनी तोंड द्यावं लागतं. रुक्मिणीचे आई, वडील, चार भाऊ रुक्मिणीच्या बाजूने असले, त्यांची जरी रुक्मिणीचा श्रीकृष्णासोबत विवाह होण्यास सम्मती असली तरी, राज्याचा वारस सर्वात थोरला भाऊ रुक्मी आणि शिशुपाल चांगले मित्र होते. रुक्मीला हेही माहित होतं की रुक्मिणीला कृष्णासोबत विवाह करायचा आहे. तरीही तो ह्या विवाहाच्या पूर्ण विरोधात होता. मैत्रीत मित्राचे दुर्गुणही दिसेनासे होतात. तो सद्गुणांचा पुतळा वाटू लागतो. आपल्या बहिणीने आपल्या इच्छेनुसार शिशुपालाशीच लग्न केलं पाहिजे. आणि शिशुपालच तिला योग्य वर आहे हाच रुक्मीचा हेका होता. रुक्मीने बहिणीच्या स्वयंवराची जय्यत तयारी केली. रुक्मिणीने काही भलतेसलते करु नये म्हणून तिच्यावर सक्त पहारा बसवला होता. सर्व बाजूंनी असा पूर्ण पहारा असताना मुलीने करावे तरी काय? पण रुक्मिणीने हाय खाल्ली नाही. लग्न करीन तर कृष्णाशीच! हा तिचा निश्चय तिला पुढचा रस्ता दाखवायला एखाद्या पणतीप्रमाणे साथ देत राहिला. तिने पत्र लिहिलं कृष्णाला, आणि एका विश्वासू ब्राह्मणासोबत सत्वर द्वारकेला रवाना केलं .

 

‘‘हे भुवनसुंदरा, आपली ओळखपाळख नसतानाही मी तुला निर्लज्जपणे पत्र लिहीत आहे असे कोणाला वाटेल. पण वेळच अशी आहे. मैत्री, साम्राज्य आणि पैसा पाहून दुर्गुणी शिशुपालाशी माझा विवाह करण्याचा घाट माझ्या भावाने घातला आहे. साम्राज्य, सम्पत्तीचा मला मोह नाही. तुझे सद्गुण मी ऐकून आहे.  कंसाच्या अन्यायाविरुद्ध तुझा प्रकट केलेला पराक्रम, आणि नंतरही वेळोवेळी जनहितासाठी कणखरपणे उभं राहणं मला मोहित करून गेलं आहे. कंस वधानंतर उग्रसेन महाराजांना त्यांचं राज्य सोपवतांना दिसून आलेला तुझा निर्मोहीपणा माझ्या मनाला भावून गेला आहे.’’

 

कीर्ती तुझी भुवनसुंदर ऐकता मी

येताच सद्गुण तुझे सहजीच कानी

घेतीच ठाव मम ते सहजी हृदीचा

होई प्रसन्न मन हे नच खेद चित्ता ।। 1.1

 

झाले मनोहरचि विश्व तुझ्यामुळे हे

झालाचि हा सफळ जन्म असेचि वाटे

पाहे तुझ्या अति मनोहर जो छबीस

त्यासी गमे उमगला मनि जीवनार्थ ।। 1.2

 

मी भाळुनी तव गुणांवर मोहना रे

लज्जाहि पार विसरून तुला स्मरे रे

कृष्णा मनोमन तुला वरिले हृदी मी

लागे तुझीच मज आस सदा मनासी ।। 1.3

‘‘कोणा लुच्च्या लफंग्याबरोबर फक्त सम्पत्तीसाठी मी माझ्या मनाविरुद्ध विवाह करु शकत नाही. समान योग्यतेच्या वधुवरांचे विवाह होतात. एखाद्या बलशाली वनराज सिंहालाच शोभेल असं भाग्य आणि त्याच्या योग्यतेचा हिस्सा एखाद्या कोल्ह्या लांडग्याच्या वाट्याला जावा हे काय योग्य आहे काय? मी अत्यंत सुशील, सदाचारी आहे. शिशुपालाच्या तावडीत सापडून माझ्या कुलशीलाच्या, सद्विचारांच्या, माझ्या पवित्र देहाच्या चिंधड्या उडाव्यात हे मला मान्य नाही. मी तुला मनाने वरलं आहे.’’ (रुक्मिणीची ही कणखर भूमिका आजही मला फार स्वागतार्ह वाटते.)

 

ऐश्वर्य, सद्गुण, तुझे कुळ, शील, विद्या

 वा देखणेपण सवेचि पराक्रमाच्या

तारुण्य, उज्ज्वल तुझा महिमा मुकुंदा

तूची बलाढ्य जगति नरसिंहरूपा ।। 2.1

 

सार्‍या जना सुखविते प्रतिमा तुझी ही

कैसी न ती मग रुचे तरुणींस चित्ती

सांगा कुणी कुलवती अति धैर्यशाली

बाला गुणी नच वरेलचि का हरीसी ।। 2.2

आत्माच अर्पण तुम्हा प्रभु  मीच केला

स्वीकार पत्नि म्हणुनी करि कृष्णनाथा

जो श्रेष्ठ भाग वनराजचि केसरीचा

कोल्हा कसा करु शके लव स्पर्श त्याला ।। 3.1

‘‘शिशुपाल माझ्याशी विवाह करण्यासाठी अधीर झाला आहे. तो कुठल्याही थराला जायला मागेपुढे बघणार नाही. त्याला मगधपतीचा मोठा पाठिंबा आहे. सर्व सैन्यानिशी जरासंधाने राज्याबाहेर तळ ठोकला आहे. कसंही करा पण माझा हा अन्यायाने होणारा विवाह रोखा. आपण कौंडिण्यपूरला या. मगधपती जरासंधाचा पराभव करुन मला घेऊन जा. मी आजवर सज्जनांना, ऋषीमुनींना माझ्या वागण्याने संतोष होईल असे व्रत, नियम आणि सदाचाराने वागले आहे. आपण माझ्याशी राक्षसविवाह करून माझं पाणिग्रहण करा. (मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्यास त्याला राक्षसविवाह म्हणतात.) मी डोळ्यात प्राण आणून आपली वाट पहात आहे.’’

 

हा चेदिराज शिशुपाल धरी मनीषा

व्हावा विवाह मजसी म्हणुनीच चित्ता

हे पद्मलोचन हरी मजला हरी रे

 डोळ्यात प्राण मम आणुन वाट पाहे ।। 3.2

 

केले असेल जरि पुण्यचि मी पुरेसे

सेवा करून नित सज्जन तोषवीले

पूजा यथाविधिच ती गुरु बाह्मणांची

देऊन दान कनकादि व्रते करोनी ।। 4.1

 

मी पूजिले जरिच  देवगणास भावे

यावे तुम्ही प्रभुवरा हरण्या त्वरेने

नेईल दुष्ट शिशुपाल मला बळेची

 आधीच त्या मजसि न्या तुमच्यासवेची ।। 4.2


यावे विदर्भ नगरीत उद्या मुकुंदा

 व्हावे उपस्थित सभेत  स्वयंवराला

सैन्यासवेच नगरीत प्रवेशुनीया

तुम्ही परास्त करणे मगधापतीला ।। 5.1

 

‘‘हे मुकुंदा, दुष्ट शिशुपाल मला माझ्या मनाविरुद्ध बळजबरीने घेऊन जायच्या आत, आपण शिशुपालाला हरवून माझ्या भोवती असलेल्या सक्त पहार्‍यातून माझी सुटका करा. आपल्याला वाटत असेल की मला अंतःपुरातून घेऊन जाताना माझ्या अनेक नातलगांना ठार मारावं लागेल; तर आमच्या कुळाच्या विवाहाच्या परंपरेनुसार लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळीच, गावाच्या वेशीवर असलेल्या कुलस्वामिनीच्या मंदिरात, पार्वतीमातेच्या दर्शनाला नववधू जाते. तेथून तुम्ही मला घेऊन जा.’’ (रुक्मिणीने सर्व सुयोग्य विचार करून कृष्णाला भेटीचं योग्य स्थानही कळवलं.)

देऊन मात शिशुपालहि जिंकुनीया

जिंकून राक्षसविवाह करी मुकुंदा

तुम्ही अजेय मज न्या तव द्वारिकेला

मूल्यस्वरूप समजा निज रुक्मिणीला ।। 5.2

 

``अन्तःपुरातुन तुला हरुनीच नेता

आप्तांसवे लढुन योग्य न मारणे त्यां’’

ऐसा विचार न रुचे जरि आपल्याला

सांगेन योग्य बरवाचि उपाय तुम्हा ।। 6.1

 

मी सांगते तुज विवाहप्रथा कुळाची

आलीच चालत कितीक पिढ्या पिढ्या ही

जाते प्रभात समयी कुलदेवतेला

सौभाग्य-कांक्षिणि वधू करण्यास पूजा ।। 6.2

 

वेशीवरी नगरिच्या दिन एक आधी

त्या पार्वती-जननिच्या निज मंदिरासी

यावेचि त्याच समयी प्रभु मंदिरासी

न्यावे हरून मजला तुमच्यासवेची ।। 6.3

‘‘हे भुवनसुंदरा, स्त्री एकदाच आपला पती वरते. मीही तो वरला आहे. जर मला तो पती मिळाला नाही तर मी प्राणत्याग करीन. मला कितीही वेळा जन्म घ्यावा लागला तरी चालेल पण आपली सुयोग्य संगत मला लाभावी एवढीच माझी इच्छा आहे.’’

तो विश्वनाथ शिव, सत्पुरुष वा महर्षी

ज्याची पवित्र पदधूलचि घेउनी ही

त्यानेचि स्नान करुनीच अपाप होती

ती श्रीहरीचरण साथ मला मिळावी ।। 7.1

 

ऐसीच हो कमलनेत्र हृदी मनीषा

लाभो मला पति म्हणूनचि तू मकुंदा

ना लाभला जर हरी पति रुक्मिणीसी

ना लाभली चरणधूलचि मोहनाची ।। 7.2 ।।

 

ही रुक्मिणी व्रत कठोरचि आचरोनी

काया तिची झिजवुनी कृशकाय होई

हे कृष्णचंद्र तनुतूनचि प्राण गेले

घेईन जन्म तरिही शतदाच मी रे।। 7.3 ।।


पत्नीपदा मिळविण्या तव रे मुकुंदा

लाभावया मज तुझी पदधूल वंद्या

लाभेल निश्चित मला तव संग नित्या

न्यावे हरून मज सत्वर कृष्णचन्द्रा ।। 7. 4।।

केवढा हा निश्चय ! रडत बसणं नाही. आपल्याला योग्य वाटणारे विचार सफल होण्यासाठी योग्य कृती अत्यंत त्वरेने करणे आवश्यक होते. रुक्मिणीने हे वरील पत्र अत्यंत गुप्तपणे एका विश्वासू हुशार ब्राह्मणासोबत द्वारकेला कृष्णाकडे रवाना केलं. कृष्णानेही ब्राह्मणाचं यथोचित स्वागत करून त्याला नम्रभावे नमस्कार केला आणि आणि इतका खडतर प्रवास करून द्वारकेला येण्याचे कारण विचारलं. ब्राह्मणाने रुक्मिणीचं पत्र श्रीकृष्णाला दिलं. कृष्णाने त्याला ते पत्र वाचून दाखवायला सांगितलं. वर सांगितलेलं रुक्मिणीचं मनोगत त्याने वाचून दाखवलं आणि सांगितलं, ‘‘महाराज, आमच्या गुणी राजकन्येने आपल्याला मनाने वरलं आहे.  परवाला तिचा विवाह शिशुपालासोबत करायचा घाट तिच्या भावाने घातला आहे. तो सामर्थ्यशाली आहे. त्याचा दराराही मोठा आहे. राज्याच्या सर्व नाडया त्याच्याच हातात आहेत. त्याच्यापुढे महाराज भीष्मकांचेही चालत नाही. आपण लवकरात लवकर कौण्डिण्यपूरला यावे ही आपल्याला विनंती आहे’’.

 

त्या ब्राह्मणाचे दोन्ही हात प्रेमाने आपल्या हाती घेत आढेवेढे न घेता श्रीकृष्णाने आपल्यालाही मनातले रुक्मिणीविषयीचे प्रेम बोलून दाखवले. ‘‘आपल्या राजकन्येचे सद्गुण माझ्याही ऐकण्यात आहेत. माझंही चित्त तिच्यात गुंतलं आहे. तिच्या विचारांनी मलाही रात्री झोप येत नाही.’’ हेही प्रांजळपणे सांगितलं. आणि सर्व युद्धाची घेराबंदी तोडून मी रुक्मिणीला घेऊन येईन असं आश्वासनही दिलं. ब्राह्मण प्रसन्न मनाने निघाला आणि श्रीकृष्णाने ताबडतोब आपला सारथी दारूकाला शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प, बलाहक हे तगडे घोडे जोडून रथ सज्ज करायची आज्ञा दिली. 


(रुक्मिणीने कृष्णाला लिहीलेल्या पत्रावर कृष्णाचं सकारात्मक विचार करणं,  त्वरित निर्णय घेणं, आणि तो लगेचच अमलात आणणं  ह्या सार्‍याच गोष्टी फार भावून जाणार्‍या आहेत. आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागेल, युद्धही करावं लागेल हे तो जाणून आहे. सुजाण रुक्मिणीने कळवलेल्या जागी कळलेल्या वेळी उपस्थित रहायची दक्षताही तो घेतो 

कौंडिण्यपूरला शिशुपाल आणि रुक्मिणीच्या विवाहाचं वेगळच नाट्य रंगलं होतं)

------------------------

 पुत्रप्रेमापोटी आपल्या कन्येचा विवाह शिशुपालासोबत करायचे मान्य करून राजा भीष्मक मोठ्या उत्साहाने विवाहाच्या तयारीला लागला होता. चेदिनरेश दमघोष आपला पुत्र शिशुपाला सोबत चतुरंग सेना घेऊन, वरात घेऊन, सर्व वरातींसह कुंडिनपुरला पोचले होते. वरातीसोबत  शाल्व, जरासंध, दंतवक्त्र, विदूरथ, पौंड्रक आणि शिशुपालाचे हजारो मित्र सहभागी झाले होते. शिशुपालासमवेत आलेले हे सर्व मित्र राजे हे कृष्णाचे कट्टर शत्रू होते. आणि राजकुमारी रुक्मिणी शिशुपालालाच मिळायला हवी ह्या  विचारांनी तेथे आले होते. कृष्ण किंवा बलरामानी तेथे येण्याचे दुःसाहस केलचं तर  त्याचा पाडाव करण्याच्या उद्देशाने सारे जण आपापल्या चतुरंग सेना घेऊन आले होते. विपक्षाची ही तयारी बलरामाच्या कानावर आलीच होती. जरी कृष्णाच्या पराक्रमावर त्याचा पूर्ण विश्वास होता तरीही बंधुप्रेमामुळे आपल्याही चतुरंग सेनेसह बलरामाने कुंडनपुरला कूच केलं. श्रीकृष्णही कुंडनपुर/कौंडिण्यपूरला येऊन दाखल झाले.

------------------------

विवाहासाठी फक्त एक रात्रच मधे होती. कृष्णाचा निरोप घेऊन ब्राह्मण अजून कसा आला नाही म्हणून रुक्मिणी चिंतेत पडली होती. नाही नाही त्या विचारांनी तिच्या मनात कल्लोळ उठला होता. मन अस्वस्थ होतं. पण मन म्हणत होतं, अजून वेळ आहे. तेवढ्यात ब्राह्मण अंतःपुरात पोचला. त्याच्या चेहर्‍यावरील प्रसन्न भाव पाहूनच रुक्मिणीच्या मनातील उदासी, भय दूर झालं. ‘‘श्रीकृष्ण नगरीत पोचले आहेत. त्यांनी आपल्याला घेऊन जाण्याची सत्यप्रतिज्ञा केली आहे. ’’ ब्राह्मणाने निरोप दिला. श्रीकृष्ण राज्यात आल्याचा निरोप  मिळताच रुक्मिणीचं हृदय आनंदानी भरून आलं. ब्राह्मणाला श्रीकृष्णाची प्रशंसा करताना शब्द कमी पडत होते. श्रीकृष्णाच्या भेटीने भरून पावलेल्या आणि श्रीकृष्णमय झालेल्या त्या ब्राहमणाला श्रीकृष्णाशिवाय अजून काहीच प्रिय नाही हे ओळखून त्याला अजून काही न देता रुक्मिणीने नम्रपणे नमस्कार केला.  

-----------

रुक्मिणी आणि शिशुपालाचा विवाह पाहण्यासाठी श्रीकृष्णही आले आहेत ह्याची वर्दी राजा भीष्मकाला देण्यात आली. भीष्मक मोठा चतुर होता. काय समजायचं ते समजला. तो स्वतः श्रीकृष्णाच्या स्वागताला गेला. त्याचं सर्व प्रकारे आदरातिथ्य आणि स्वागत करून, अनेक मौल्यवान भेटवस्तूही दिल्या. विदर्भाच्या नागरिकांना कृष्ण आल्याचं कळताच सारी प्रजा कृष्णाला पहायला लोटली. जणु डोळ्यांनी त्याला पिऊन घेऊ लागली. त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहून सारे  रुक्मिणीला हाच पती योग्य आहे आणि कृष्णानीच आमच्या राजकन्येचं पाणिग्रहण करावं असं एकमेकात बोलू लागले.

-------------------------

रात्र संपत आली. बाहेर फटफटलं. आणि आभूषणांनी सजलेली रुक्मिणी मौन व्रताने पायी देवीच्या मंदिरात जायला निघाली. तिच्या सोबत तिच्या मैत्रिणी, कुलाचार जाणणार्‍या वृद्ध स्त्रिया, शस्त्रास्त्रधारी शूर सैनिक, मंगल वाद्ये वाजविणारे कलाकार, गाणी गाणारे गायक, नगरजन होते. ह्या उत्सव यात्रेत इतरही राजे सहभागी झाले होते. कुलाचार जाणणार्‍या वृद्ध स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे रुक्मिणीने यथासांग पूजा केली. तिने पार्वतीला प्रार्थना केली, ‘’हे अंबिके, तुझ्या मांडीवर बसलेल्या गणपतीला आणि तुला मी मनापासून प्रार्थना करते. माझी अभिलाषा पूर्ण होवो असा आपण मला आशीर्वाद द्यावा.’’ तेथे आलेल्या सर्व वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध स्त्रियांना नमस्कार करून, त्यांनी दिलेला प्रसाद ग्रहण करून तिने आपलं मौनव्रत सोडलं आणि रत्नजडित अंगठी असलेल्या आपल्या हातानी आपल्या सखीचा हात पकडून  ती गिरिजामंदिराच्या बाहेर पडली.

तिचं वेड लावेल असं सौंदर्य, तिची राजहंसारखी डौलदार चाल, तिच्या चेहर्‍यावरील मंद स्मित, तिचे कुंदकळ्यांसारखे दात, हातानी आपल्या पुढे आलेल्या बटा मागे सारत सर्व राजांकडे बघून केलेलं लज्जायुक्त मंद स्मित पाहून सर्व वीर तिच्यावर मोहित होऊन गारद झाले. त्यांच्या हातातील शस्त्रही गळून पडली. त्याचवेळी तिला श्रीकृष्ण दृष्टीस पडले.. रुक्मणी आपल्या रथावर चढणार होती इतक्यात शेकडो शत्रूराजांच्या गर्दीत, त्यांच्या नाकासमोर श्रीकृष्णाने रुक्मिणीला उचललं आणि सर्वांसमक्ष आपल्या रथात बसवलं. त्यांच्या रथावर गरुडाचं चिह्न असलेला ध्वज फडकत होता. सर्व लांडग्या कोल्ह्यांमधून सिंह आपली शिकार घेऊन सहज निघून जावा त्याप्रमाणे रुक्मिणीला घेऊन बलराम आणि यादव सैन्यासह  श्रीकृष्ण वेगाने निघून गेला.

---------------  

जरासंध आणि इतर गर्विष्ठ राजांना हा अपमान जखमेवर मिरची चोळल्याप्रमाणे झोंबला. आपल्या डोळ्यादेखत कृष्णाने रुक्मिणीला पळवून न्यावे आणि आम्ही धनुष्यसज्ज असूनही नुसतच बघत बसलो; ह्या विचारांनी त्यांचा चरफडाट झाला. सगळेजण जरा सावरताच जरासंधाची सेना कोणी घोड्यावर, कोणी रथात तर कोणी हत्तीवर बसून कृष्णाचा पाठलाग करू लागले. यादवसेनेवर बाणांचा वर्षाव होऊ लागला. रुक्मिणीच्या डोळ्यात लज्जा भय दोन्ही दाटलं. ती कृष्णाकडे पहात असतानाच तिला आश्वस्त करत कृष्ण म्हणाला, ‘‘राजकुमारी, घाबरू नकोस. यादवसेना ह्या सर्वांना परास्त करेल.’’  झालंही तसच! यादव सैन्यानी दिलेल्या तिखट प्रत्युत्तरानी शत्रू सैन्याचे हत्ती, घोडे, रथ, त्याच्यावर बसलेले वीर, त्यांची शिरस्त्राणं धडाधड खाली पडून जमिनीवर तुटलेले हात, पाय, मुंडकी, मोडलेले रथ, योद्ध्यांच्या अंगावरील वस्त्र, कुंडलं, दागिने ह्यांचा खच पडला. जरासंधाची सेना पाठ दाखवून पळत सुटली. यादवांच्या चुटकीभर सेनेने जरासंधाच्या बलाढ्य सेनेचा सपशेल पराभव केला.

झाल्या प्रसंगाने, तीव्र अपमानाने, मनात रुक्मिणीची अभिलाषा धरून आलेल्या शिशुपालाचा सर्व उत्साह गळून गेला. तो मनाने पूर्ण खचला. मृतःप्राय झाल्यासारखा पडून राहिला. पण रुक्मीला आपल्या बहिणीला कृष्णानी पळवून न्यावं ह्याचा संताप अनावर झाला. एक अक्षौहिणी सैन्य घेऊन तो कृष्णाशी लढायला निघाला. ‘‘त्या गवळ्याचा माज मी आज उतरवतो. कृष्णाला ठार मारून रुक्मिणीला घेऊन परत आलो नाही तर मी कौंडिण्यपूरात प्रवेश करणार नाही. ’’अशी महा प्रतिज्ञा करून  तो एक अक्षौहिणी सैन्य घेऊन वेगाने निघाला. वेगाने कृष्णाच्या रथापाशी पोचताच तो ओरडला, ‘‘अरे थांब थांब! यादव कुलाचा तू कलंक आहेस. कावळ्यानी पवित्र होमाची सामग्री पळवावी त्याप्रमाणे तू माझ्या बहिणीला पळवून नेत आहेस. तू मायावी आणि युद्ध कलेत निपुण आहेस असा तुला गर्व झाला आहे. आत्ताच मी तुझ्या गर्वाचं घर खाली करतो. जोवर मी तुला जमनिवर लोळवत नाही तोवर ह्या मुलीला सोडून निघून जा.’’ त्याने तीन बाण कृष्णावर सोडले. पण हसत हसत कृष्णाने  त्याच्यावर बाण सोडून त्याचं धनुष्य मोडून टाकलं. रथाचा ध्वज पाडला. त्याला कृष्णाच्या ताकदीचा अंदाज नव्हता. रुक्मीने जे आयुध हातात घ्यावं ते चालवायच्या आधीच कृष्णाने आपल्या बाणाने मोडून टाकावं असं बराच वेळ घडत राहिलं. शेवटी हातात ढाल तलवार घेऊन त्याने कृष्णाला मारण्यासाठी रथातून उडी मारली. त्याबरोबर कृष्णाने आपल्या बाणांनी त्याच्या ढाल तलावारीचे तुकडे तुकडे केले. हातात तलवार घेऊन ते रुक्मीला ठार मारणार इतक्यात भयानी कापणारी रुक्मिणी कृष्णाच्या पायावर पडली आणि ‘‘माझ्या भावाला मारू नका’’ म्हणत तिने कृष्णाचे पाय पकडले. रुक्मिणीची अवस्था पाहून कृष्णाने रुक्मीला मारण्याचा विचार सोडून दिला. पण त्याच्याच उत्तरीयाने त्याला बांधून त्याची दाढी, मिशी आणि केस ठिकठकाणी मुंडन करून त्याला कुरूप बनविलं.आणि सोडून दिलं अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या रुक्मीला पाहून  मागून येणार्‍या बलरामाला दया आली त्याने त्याला बंधमुक्त केलं.  कृष्णाच्या वागण्याचं त्याला वाईट वाटलं. ‘‘कृष्णा, तू हे योग्य केलं नाहीस. तुला हे शोभलं नाही.’’ म्हणून त्याने कृष्णाची कानउघाडणी केली आणि त्याचप्रमाणे त्याने रुक्मिणीची मनापासून माफी मागितली. त्यामुळे रुक्मिणीच्या मनातील किल्मिष दूर झालं.

द्वारकेला पोचताच श्रीकृष्ण रुक्मिणीचा साग्रसंगित विवाहसोहळा पार पडला.

 

कोणी म्हणेल की, एका लग्नामुळे केवढा हा विनाश! हजारो सैनिक मारले गेलेच वर हत्ती, घोडे, आणि केवढ्या सम्पत्तिचं नुकसान! दोन कुळं जोडली जाण्या ऐवजी दोन कुळं कायमची एकमेकांची शत्रू बनली. रुक्मिणीने थोडं ऐकलं असतं भावाचं तर काय बिघडलं असतं? इतका विनाश एका लग्नासाठी आवश्यक आहे का? तर त्याचं उत्तर हेच आहे की, ही एका मुलीची बाब नाही तर संपूर्ण स्त्रीवर्गाच्या सन्मानपूर्वक जगण्यासाठी झालेली लढाई आहे. ती लढाई वर-वधू दोघेही लढले. कृष्णानेही रुक्मिणीला पूर्ण साथ दिली. एका मुलीला मानसन्मानानी जगण्यासाठी घेतलेला हा योग्य निर्णय इतर हजारो मुलींना दिशादर्शक ठरतो. त्याचप्रमाणे तिचा बळजबरीने नालायक मुलाशी विवाह लावून देणार्‍या आप्तांना एक कणखर, खणखणीत संदेशही देतो. एका सुदृढ समाजाची ही गोष्ट आहे.

----------------------------

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

पुस्तके (अनुक्रमणिका)

।। दशसुन्दरीचरितम् ।। (अनुक्रमणिका)

1 ।। दशसुन्दरीचरितम् ।। (माझ्या जीवाभावाच्या दहा मैत्रिणी -)