5 ॥ दश-सुंदरी-चरितम् ॥ (दौंड)

 

।। दसुन्दरीरिम् ।।


5 अपूर्व पूर्वा

        नगरहून दौंडला बदलीचे खलिते पोचताच दौंडला स्वागताच्या पायघड्याच अंथरायला सुरवात झाली. दौंडहून स्वागताच्या नौबतीच वाजू लागल्या. दौंडच्या SRP ग्रुपला पहिल्यांदाच pramotee officer ऐवजी डायरेक्ट IPS Officer  नेमला जात होता.  “सर आपली एक कंपनी नगरच्या जवळ आहेच आपलं सामान किती आहे? सामान पॅकिंगला माणसं आणि न्यायला दोन फायु टनर गाड्या पाठवू?” SRP चे ऑफिसर्स विचारत होते. तेव्हा पॅकर्स मूव्हर्स  पद्धतच नसल्याने आम्हाला प्रायव्हेट ट्रक्स जरी मिळाले तरी पॅकिंगला पोलीसदलाच्या मदतीवरच अवलंबून रहावे लागे. आमचं सामान साडेतीन महिन्यांनंतरही तेवढच होतं. फायुटनरच्या कोपर्‍यात मावून गेलं.        

                    सर्वांनी सांगितलं की नगर दौंड रेल्वेनी जाणं जास्त सुरक्षित आहे. आणि लवकरही पोचाल. कारण तेव्हा सिद्धटेक आणि दौंड जोडणारा भिमा नदीवरील पूल झाला नव्हता. शिवाय रस्त्यांची स्थितीही दयनीय होती. खड्ड्यातून जातांना बसणारे हादरे माझ्या स्थितीला अवघड वाटत होते. ट्रेन वेळेवर सुटली पण घोडा आडवा आला. आपल्याकडे 1 घोडा का अडला? , 2 भाकरी का करपली, 3 तलवार का गंजली अशा तिनही प्रश्नांचं एकच उत्तर मिळत असे की, फिरवला/ली नाही म्हणून. पण आत्ता मात्र घोडा का अडला ह्याचं उत्तर फार दयनीय होतं. घोड्यासारखे वेगवान प्राणी वा बैलासारखे ताकदवान प्राणी फार दूरवर पळून जाऊ नयेत म्हणून त्यांचे एका बाजूचे दोन पाय दोरीने एकत्र बांधून ठेवायची माणसाची क्रूर पद्धत एका चांगल्या उमद्या प्राण्याचे प्राण घेऊन गेली.

                       पण असे  कितीही घोडे अडले आणि कितीही माशा शिंकल्या तरी ते आम्हाला अडवू शकत नव्हते किंवा प्रवीणसरांच्या कामात बाधाही घालू शकत नव्हते. तीन चार तास उशीरा का होईना  आम्ही दौंडला पोचलो.

दौंड

  माझ्या सख्यांचा हात धरून मी एका वेगळ्याच स्वप्नात, एका वेगळ्याच नशेत जात होते. कुठेही! प्रवीणची नोकरी नेईल तिथे. आणि - -रेल्वेनी जातांना इतरवेळी रुक्ष पण रेल्वे जंक्शन असल्यामुळे अपरिहार्य वाटणार्‍या दौंडला, S.R.P. Group 7 ला commandant  म्हणून प्रवीणची  बदली झाली. (1981) S.R.P. group 5 आणि 7 दोन्हीही दौंडला आहेत

      पहिल्यांदाच दौंडच्या फलाटावर सामानसुमान घेऊन राहण्याच्या इराद्याने उतरलो. इतके दिवस ट्रेनचं इंजिन मागे किंवा पुढे लावण्यासाठी थांबणार्‍या फलाटापुरतीच ओळख असलेलं दौंड आता अंतरंगात शिरून बघणार होतो. अनेक बंद, मोर्चे, उत्सव, कायदा, सुव्यवस्थेची अवघड परिस्थिती हाताळणार्‍या S.R.P. परिवाराचं आयुष्य असतं तरी कसं हे जवळून पहायची, अनुभवायची संधी मला मिळणार होती. त्यांच्या परिवाराचं सदस्य होणं हेच मला मोठं अप्रूप होतं. मनात अपेक्षांपेक्षा कुतुहल ओतःप्रोत भरलेलं असलं की पुढे येणारी प्रत्येक गोष्ट नाविन्यानी भरलेली राहते. माळरानावरही गवतफुलं तुमच्या स्वागताला सज्ज असतात. भर मध्याह्नीला काटेरी बाभळही इवल्या इवल्या केसाळ गोंड्याच्या पिवळ्या फुलांची छत्री डोक्यावर धरून उभी राहते. तिचा दोन इंचाचा काटाही जवळून बघतांना टोकदार म्हणजे किती टोकदार ह्याचं परिमाण दाखवून जातो. जमिनीच्या पोटातले झरेही तुम्हाला ऐकू यायला लागतात. पारावर बसलेला एखादा गावरान म्हाताराही तुम्हाला शिल्पाहून सुंदर असल्याचं लक्षात येत. इथे तर एका मोठ्या परिवाराचे कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही पोचलो होतो. त्यामुळे आमच्या स्वागतालाही पन्नासएक कडक इस्रीच्या गणवेशांचा हसरा ताफा पुष्पगुच्छ घेऊन हजर होता.  ह्या 1100 लोकांच्या परिवाराचा मुख्य ह्या नात्याने प्रवीणवर कुटुंबप्रमुखाची जबाबदारी होती तर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्यासाठी कल्याणकारी कार्यक्रमात प्रवीणला साथ देणं हे माझं काम होतं. प्रवीणसर 25 वर्षांचे आणि मी 22 वर्षांची. पण वय महत्त्वाचं नसतच मुळी. तुम्ही कुठल्या आसनावर बसला आहात त्यानुसार ते आसन तुम्हाला तसं वागायलाच लावतं.

त्यावेळचं दौंडही वेगळच होतं. गावाबाहेर एका छोट्याशा टेकडीवर असलेला लांब रुंद  बंगला मनाला सुखावून गेला. सकाळीच बंगल्यामागे पसरलेल्या प्रशस्त टेकडीवर आलो





नृत्याच्या वेगवेगळ्या मुद्रा साकारत बाभळी तोल सावरत उभ्या होत्या. कमरेत तीन तीन ठिकाणी वाकलेल्या ह्या बाभळी अंगाला तीन ठिकाणी बाक देऊन उभ्या असलेल्या दक्षिणेतील त्रिभंगाकृती देवांच्या सुबक मूर्तींसारख्या वाटल्या. झिपरे कडुनिंब स्वानंदाच्या ओलाव्यात सुस्नात होऊन उभे होते. आधे मधे तुरळक आंब्याची, चिंचेची झाडंही दिसत होती. खुरट्या गवतावर मेंढ्यांचे कळप मेंऽऽऽमेंऽऽऽ  करत माना वर खाली हलवत उड्या मारत धावत होते. त्यांचे कानही त्याबरोबर वर खाली होत होते. खिल्लारी बैलांची एखादी गाडी रस्त्यावरुन दुडुदुडु धावत होती. त्यांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणत होत्या. गवळणी डोईवर घडे घेऊन पाण्याला चालल्या होत्या. क्षितिजापर्यंत पसरलेली ओसाड सपाटीही सुंदर असू शकते असं वाटलं. ज्या प्रमाणे लग्नाआधी भेटणारे प्रेमवीर लोकांच्या नजरापासून लपण्यासाठी कुठला तरी आडोसा शोधत असतात. पण काळ्या पोतीचा धागा गळ्यात असला  तर हातात हात घालायला समाजाचं भय रहात नाही तसा इथे आकाश आणि पृथ्वीच्या मिलनाला ह्या माळरानावर डोंगराच्या आडोशाची गरज नव्हती. दोघांच्या मिलनातून पूर्वेच्या क्षितिजावर मे फ्लॉवर सारखा लालबुंद गोळा जमिनीच्या पोटातून वर येत होता. हिरण्यगर्भाचा जन्म सोहळा! तेवढ्यात घराच्या परिसरात असलेल्या विलायती चिंचेवरून पेलिकनच्या जोडीनी आकाशात झेप घेतली. आम्ही हरखून गेलो. हे पेलिकन रोज आमचे रात्रीचे सख्खे शेजारी होते. छे छे आमच्या कुटुंबाचाच भाग होते. रोज सकाळी शाळेत जाणारी मुलं संध्याकाळी परत घरी येतात, तशी सूर्योदयाला बाहेर पडणारी ही पेलिकनची जोडी रोज सूर्यास्ताला विलायती चिंचेच्या झाडावर परत येई. तेवढ्यात कुऽऽऽऽऽऽ,झुकझुकझुक आवाज करत खेळातली ट्रेन जावी तशी नॅरोगेज दौंड-बारामती ट्रेन शिट्या वाजवत आली. दिवाळीचा किल्ला मांडून ठेवावा तसं समोरचं दृश्य होतं.  रोज कुकगाडीच्या वेळेला ही शिट्या वाजवत जाणारी छोटी ट्रेन पहायला आम्ही सहसा विसरत नसू.

अपूर्व पूर्वा / प्राची -

               सूर्य उगवतो ती पूर्व आणि सूर्य मावळतो ती पश्चिम ह्या माझ्या बालपणीपासून शिकलेल्या ज्ञानाला मन मात्र कधी दुजोरा देत नसे. एकदा एका तळ्यात एक बदकआई तिच्या 8-10 पिटुकल्यांना घेऊन पोहता पोहता त्यांच्या सोबत खेळतांना पाहिली होती. पोहता पोहता मधेच ती पाण्यााखाली बुडी मारायची. सर्व पिल्लं बावचळून इकडे तिकडे पहात असताना ही कुठतरी लांब पाण्यातून डोक वर काढत बाहेर येई. सर्व पिल्लं भराभर त्यांच्या पायाची पायडल्स मारत तिच्या दिशेनी पोहायला सुरवात करत. तिच्या पर्यंत पोचतात न पोचतात तोपर्यंत ती परत डुबी घेई. त्यांचा हा खेळ मीही काळाचं भान हरपून बघत राहिले.  आज असं वाटलं हा सविताही आपल्यासोबत हाच खेळ खेळत आहे. आज ह्या डोंगरामागून येणारा सूर्य उद्या अजून थोडा पलिकडून बाहेर निघतो. 22 जून ते 21 डिसेंबर रोज हातभर दक्षिण कडे सरकणारा सूर्य आज कुठून बाहेर येतोय पहायला मी डोळे लावून वाट बघत राहते. 21 डिसेंबर ते 22 जून पर्यंतचा त्याचा उत्तरेकडे चाललेला प्रवास पहाता केवढ्या लांबच लांब क्षितिजरेषेवर तो फिरत असताना पूर्व कशी ठरवावी?

 सगळ्यात मोठा दिवस 21 जून ते सगळ्यात छोटा दिवस 21 डिसेंबर पर्यंत सूर्य चांगला दक्षिण-उत्तर कितीतरी अंशात फिरतांना दिसे. थंडीत एका  खिडकीतून डोकावणारा सूर्य उन्हाळ्यात वेगळ्याच खिडकीतून डोकावतांना दिसे. रोज सूर्य वेगवेगळ्या जागी उगवतांना पाहून ही कोणालासूर्य नक्की पूर्वदिशेलाच उगवतो काहोअसा प्रश्न विचारायची माझी कधी हिम्मत झाली नाही. नागपूरला श्री. चंद्रगुप्त वर्णेकर भेटले आणि आणि अचानक गुंता सुटला. “भारतीय खगोलशास्त्राप्रमाणे सूर्य उगवतो ती पूर्व असं आपण मानत नाही. कृत्तिका उगवते ती पूर्व.” ते ऐकल्यावर मला माझ्या मनातली पूर्व सापडल्याचा आनंद झाला.  मनाच्या तळाशी खोल खोल बाटलीबंद करून ठेवला तरीही छळणारा विचारांचा राक्षस मुक्त झाला. पूर्वा भेटण्यासाठी मी कृत्तिका शोधू लागले. पण पूर्वा गवसत नव्हती.

             रस्त्यातून चालतांना आपल्यासोबत अनेक जण चालत असतात, म्हणून गर्दीतील त्या सर्वांची आपली ओळख असतेच किंवा होतेच असं नाही. कधी तरी कुठेतरी आपली भेट झाली, गप्पा झाल्या म्हणजे आपण जीवाभावाचे मित्र होतोच असंही नाही. पण कधी सगळ्या गर्दीतसुद्धा एखादा चेहरा आपल्या मनाला स्पर्श करून जातो. मग आपण शोधत राहतो-- तो चेहरा - - मनाला चाटून गेलेला. कधी कधी नुसती नजरा नजरही आश्वस्त करत असते--- खोलवर हृदयात! ही पूर्व पश्चिमेची जोडी आपल्याला अशीच सतत भेटत असते. आपण दिल थामके त्यांची वाट बघत असतो आणि ह्या जराही लक्ष देता निघून जातात. त्यामुळे `सनराईझ' आणि सनसेट'-पॉईंटच्या रँपवरून नजाकतीनी चालत येणार्‍या ह्या गजगामिनी अनेकांना नेत्रसुख देत असल्या तरी त्यांच्याशी गुज साधेलच असं नाही. कधी महत्प्रतिक्षा करूनही ह्या रूपगर्विता तुमची भेट नाकारून अशा काही सहजतेने निघून जातात की जशी कॉलेजमधे सगळ्यांची धडकन ठरलेली एखादि सुंदरी अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलाबरोबर झटपट लग्न होऊन अचानक कॉलेजमधून नाहिशी व्हावी. कधी आपली काहीच अपेक्षा नसते. कुठल्यातरी भलत्याच कामाचं बोचक पाठीवर टाकून आपण जात असतो आणि अचानक ह्या सुंदरी अशा काही नखर्‍यात सामोर्‍या येतात की `` हाय मार डाला!'' निरभ्र आकाशातून मन मानेल तसं हिंडणार्‍या पांढर्‍या एकट्या दुकट्या गबदुल्या ढगाला अचानक गुलाबी करणार्‍या सूर्यकिरणासारख्या अचानक एखाद्या सुंदरशा रंगानी तुम्हाला उजळवून टाकतात. सुंदरसं स्वप्न हृदयात अंकुरीत करून जातात.

प्रवीणसर ऑफिसला गेल्याने मी घर हिंडून बघत होते. नगरला लावलेल्या झाडांची फळं आम्हाला नगरला जरी मिळाली नाहीत तरी दौंडला वाट बघत होती. बंगल्यामागे  लावलेल्या केळीमधून केळफूल पूर्ण बाहेर येऊन डोकावत होतं. शेजारीच विलायती चिंचेच्या उंच झाडावर पांढरट गुलाबी आकडे जिलब्यांसारखे वेटोळी घालून लोंबत होते. पक्षांच्या किलबिलाटाने झाड गजबजून गेलं होतं. त्यांनी खातांना खाली चिंचेच्या भुग्याचा पांढरा सडा सांडला होता. वार्‍याने फाटलेल्या केळीच्या पानांच्या सावल्या जमिनीवर पडत होत्या.  त्या सावलीप्रकाशाच्या पट्ट्यात  खाली एका कुत्र्याची समाधी बांधलेली दिसत होती. ``आपल्या मालकासाठी ज्याने प्राण सोडला त्याच्या स्मरणार्थ’’ अशा आशयाचं काही तरी वाक्य त्यावर लिहीलं होतं. त्या कुत्र्याचं नावही लिहीलं होत. तेवढ्यात झाडीमधून पलिकडून कोणी तरी हात केला आणि लक्षात आलं अरेच्च्या! पलिकडे पण एक बंगला आहे.  मीही हात केला. ``येऊ का भेटायला’’ त्या आदबीने विचारत होत्या. माझ्या बरोबर असलेल्या S.R.P. च्या जवानाने सांगितलं, ``असिस्टंट कमांडंट पलिकडेच राहतात. त्यांच्या बाईसाहेब आहेत.’’ मीही ``या या !!’’ म्हणत स्वागत केलं. कोणाचं कुत्र होतं हे? मालकासाठी काय केलं त्यानं? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तसच राहून गेलं. आणि आम्ही गप्पा मारत आहोत हे पाहून बरोबर आलेला बंगल्याचा पोलीस गार्ड शिस्तीचे पालन करत निघून गेला. मी अजूनही कुत्र्याच्या समाधीकडे अधुन मधुन बघत असलेली पाहून बाईंनी खालच्या आवाजात ``माहित आहे का तुम्हाला ?’’ नी सुरवात केली. ``काय झाल?’’ – माझं कुतुहल.

ह्या बंगल्याचे एक *****  कमांडंट होते. शिकारीचा शौक होता त्यांना. मुलाबरोबर गाडीतून जात होते. अचानक रस्त्यात खड्डा आला. गाडीच्या त्या धक्क्याने बंदुकीतून गोळी उडाली ती थेट मुलाच्या डोक्यातच! जागच्या जागीच गेला बिचारा.’’ अत्यंत करूण कहाणी होती. वडिलांच्याच हातून आपल्याच मुलाची अशी शिकार व्हावी ही मनाला चटका लावून जाणारी गोष्ट होती. ``अरेरे!!! ‘’माझ्या तोंडातून आपोआप निघून गेलं. ----``आणि कुत्र?’’

``ते कुत्र त्या मुलाने पाळलं होतं. मुलाचा मृतदेह पाहून  तो तेथेच बसून राहिला. तेथून उठलाच नाही. अन्न पाणी सोडून दिलं त्यानी आणि तेही मरण पावलं.’’ एक दुःखद करूण कहाणी होती. त्या कुत्र्याबद्दल मनातून अत्यंत सहानुभूती, प्रेम वाटलं. थोडा वेळ मी गप्प उभी राहिलेले पाहून  त्या म्हणाल्या, ``तुम्ही तुमचं देवघर केलं आहे आणि त्याच्या शेजारच्या खोलीत बसायला जो पलंग ठेवला आहे ना तिथेच त्या मुलाला ठेवलं होतं. ती खोली माझी फार आवडती खोली होती. उतरत्या छपराखालची कडेची खोली असल्याने तेथे बसून बाहेरच्या निसर्गाची गम्मत पाहण्यात वेळ सहज जाई. ``अहो आमावास्येला अनेकांना त्याचं भूत येथे हिंडतांना दिसतं.’’ आता मी सावध झाले. एका भूतासोबत राहून आल्याचा अनुभव माझ्या गाठीशी होता. असल्या छोट्या छोट्या गोष्टींनी माझ्या मनावर फारसा परिणाम होणार नव्हता.

खरं सांगायचं तर मी लहान असतांनाच भूतभयाचा क्रॅश कोर्स माझ्या मोठ्या भावानी माझ्याकडून करून घेतला होता. तो माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. दिवे गेलेले असतांना मी घराच्या अंधार्‍या बोळातून एकटी येत असतांना अचानक चेहर्‍यापुढे पंजा आणणे आणि मला किंचाळायला लावणे, घरातले लाईट गेले की हळूच मला उचलून खाली ठेवणे आणि मला भूतानी उचललं असं वाटायला लावून माझी बोबडी वळेल असे करणे, माझ्या कंपासबॉक्समधे मोठ्ठ झुरळ ठेवणे, बाकी सूर्याची पिल्ल दाखवणे, अशा महा भयंकर प्रत्यक्ष भूतबाधेतून पार पडल्यामुळे मला ह्या काल्पनिक  भूतांची भीती वाटत नव्हती. एका मोठ्या रेघेला छोटं करायचं असेल तर त्याच्यापुढे एक अजून मोठ्ठी रेघ ओढायला लागते. ती बालपणातच ओढली गेली होती.

``या नां आमच्याकडे आमचं घर बघायला’’ असं म्हणत दोन बंगल्यांच्या मधे असलेलं छोटसं फाटक उघडून आम्ही पलिकडे त्यांच्या हद्दीत गेलो. त्यांचं घर जरा अंधारं वाटलं पण मी छान आहे छान आहे म्हणून  त्यांच्या सर्व गोष्टींचं कौतुक करत असतांना त्या म्हणाल्या, अहो आमच्याकडे ना एक खोली गमतीशीरच आहे. त्याला ना कुठे खिडकी आहे ना प्रकाश यायला जागा पण त्या खोलीला कोणीतरी खालपासून छतापर्यंत सिरॅमिकच्या टाइल्स लावून घेतल्या आहेत. खरतर ह्या खोलीबद्दल, घराबद्दल मला आधीच इतरांकडून माहिती मिळाली होती. मीही ती खोली बघितली. पण काही बोलले नाही. पूर्वी अशा छोट्या पांढर्‍या टाईल्स स्वयंपाकघरातल्या ओट्याला थोड्याफार लावत असत.  वा छान आहे की. तुमचं देवघर इथे केलं अगदि योग्य केलं मी त्यांच कौतुक केलं. खरतर वयानी त्या माझ्या आई एवढ्या असल्या तरी माझ्याकडे गटप्रमुखाच्या पत्नीची जबाबदारी असल्याने मला त्यांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवणं भागच होतं. बाई तशाही थोड्या थोड्या गोष्टींना घाबरणार्‍या होत्या. त्या खोलीचं रहस्य मला  आधीच सर्वांकडून माहित होत. त्यांना जर मी खरं खरं सांगतलं असतं की------

-------------------------------------

--------------------------

-----------------

ती खोली दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी इग्रजांनी बांधलेलं प्रेतागार आहे तर माझ्याऐवजी त्याच बेशुद्ध पडल्या असत्या. आणि त्यांनी त्या घरात राहायलाच नकार दिला असता तर? मला माझा एकुलता शेजार घालवायचा नव्हता.  असो!!!!!!!

--------------------------------------

दौंडच्या जवळ नानवीज नावाचं गाव आहे. तेथे इंग्रजांच्या वेळेस बीमवायरलेस स्टेशन होते. तेथून मेसेजेस एडनला पाठवले जायचे आणि तेथून लंडनला.  दुसर्‍या महायुद्धामधे आपल्या सैन्याच्या अनेक पलटणी इंग्रजांच्या बाजूने युद्धात लढल्या होत्या. त्यात महाराष्ट्राच्या झुंजार मराठा रेजिमेंट आणि महार रेजिमेंटही होत्या. युद्धात अनेक भारतीय सैनिकांना जीव गमवावा लागला होता. त्यांच्या परत येणार्‍या डेडबॉडीज ठेवायला दौंडला प्रेतागार बनवलं होतं. ती जागा  नंतर SRP group साठी वापरली जाऊ लागली.  

 कालौघात बीम वायरलेस स्टेशनचं महत्त्व कमी झालं. तेथील ऑफिस हलवायचं काम सुरू झालं. आजूबाजूच्या गावातील लोकं तेथे घसून तेथील जमिन, घरे वा तेथील इमारतींचे साहित्य बळकावून बसू नयेत म्हणून  दीक्षितांनी SRP  चा बंदोबस्त तिथे लावला. ती जागा पोलीसांना / SRP  ला मिळावी म्हणून तेव्हाच्या रेडिओ आणि ब्रॉडकास्टिंग मंत्र्यांशी संपर्क साधला गेला. अत्यंत सुंदर, प्रशस्त असलेला हा परिसर तेव्हाच्या योग्य हालचालींमुळे पोलीस खात्याच्या ताब्यात आाला

नंतर अनेक वर्षांनी तेथे जायची वेळ आली तेव्हा पोलीस ट्रेनिग स्कूल मधे परिवर्तित झालेली ही जागा मोठ्या दिमाखात उभी होती. प्रवीण दीक्षित तेंव्हा पोलीस हौसिंग चे मुख्य असल्याने नानविजला पोलीसांची मेस, घरे असे सर्व सुंदर बांधकाम केलेले मला पहायला मिळाले. एक निसर्गरम्य परिसर अनेक सुधारणांनी, पोलीसांच्या शिस्तबद्ध कामानी अजून चांगला झाला होता.  

----------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

पुस्तके (अनुक्रमणिका)

।। दशसुन्दरीचरितम् ।। (अनुक्रमणिका)

1 ।। दशसुन्दरीचरितम् ।। (माझ्या जीवाभावाच्या दहा मैत्रिणी -)